उष:काल होता होता, काळरात्र झाली
अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली!
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली?
अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली!
आम्ही ती स्मशाने ज्यांना, प्रेतही ना वाली;
अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली!
कसे पुण्य दुर्दैवी अन् पाप भाग्यशाली?
अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली!
आंसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली;
अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली!
तिजोर्यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती,
आम्हावरी संसाराची उडे धूळ माती!
उभा देश झाला आता एक बंदिशाला,
जिथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला!
.. सुरेश भट








